राजाराम नारोजी शिरोळे पाटील
● फर्ग्युसन कॉलेजचा इतिहास नक्की वाचा ●
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठ अनुदान आयोगाचा (युजीसी) वारसा दर्जा प्राप्त झाल्याची बातमी ६ जुलै च्या टाईम्स ऑफ इंडिया व इतर वृत्तपत्रातुन वाचनात आली.या दर्जाद्वारे आता संस्थेला केंद्र सरकारकडुन ५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.संस्थेच्या यशाबद्दल त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन.यानिमित्ताने संस्थेच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या अनेकांचा गौरव वर्तमानपत्रे,दुरदर्शनवर होताना दिसत आहे.तो व्हायलाच हवा.पण हे होत असतानाच इतिहासामध्ये संस्थेच्या उभारणीसाठी खऱ्या अर्थाने ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा काही प्रमुख व्यक्तींचाही उल्लेख यानिमित्ताने होणे अपेक्षित होते.मात्र तसा उल्लेख कुठेच होताना दिसत नाही याचे शल्य मनाला बोचत होते.किंबहुना त्या प्रमुख व्यक्तींचा उल्लेख केला नाही तर संस्थेचा इतिहास पुर्णच होऊ शकत नाही.याच पार्श्वभूमीवर फर्ग्युसन कॉलेजच्या जमीनीचे विद्यमान सातबाराधारक मालक असणाऱ्या मा.मालोजीराव शिरोळे,पुणे (मोबाईल क्रमांक 9881819205) यांच्या इतिहासप्रेमी प्रशांत धुमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचे सविस्तर वृत्त.
दि.७ जुलै २०१५)
फर्ग्युसन कॉलेज आज ज्या जागेवर उभे आहे,ती मुळची जमीन नारोजी सुलतानजी शिरोळे यांच्या मालकीची होती.नारोजींना राजाराम नावाचा मुलगा होता.या राजारामांना शामराव,भगवंतराव व गणपतराव नावाची तीन मुले होती.शिरोळे हे शिवरायांच्या काळापासुन ऐतिहासिक महत्व असणारे ताकदवान मराठा घराणे होते.भांबुर्ड्याची (आजचे शिवाजीनगर) पाटीलकी त्यांच्याकडे होती.या भागातील बरीच जमीन त्यांच्याकडे होती.नारोजींच्या मृत्युनंतर जमीनीची मालकी त्यांचे पुत्र राजाराम शिरोळे यांच्याकडे आली.
पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी त्याआधी १८४८ पासुनच बहुजन समाजात शिक्षणाचा प्रचार चालु केला होता.प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे म्हणुन १८८२ मधे हंटर कमीशनला त्यांनी साक्ष दिली.दुसरीकडे गोपाळ आगरकांनी बाळ टिळकांच्या जोडीने शिक्षणक्षेत्रात काम चालु केले होते.१८८० मधे न्यु इंग्लिश स्कुल त्यांनी सुरु केले.१८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन १८८५ ला फर्ग्युसन कॉलेज सुरु केले.परंतु कॉलेजला जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना १८९५ पर्यंत हे कॉलेज गद्रेंच्या जुन्या वाड्यात व पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी भरवावे लागले.यात खुप अडचणी येत होत्या.शिवाजीनगर गावठाण परिसरात शिरोळेंच्या मालकीची बरीचशी जमीन असल्याचे आगरकरांना ज्ञात होते.परंतु शिरोळे पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यास आगरकर व टिळक धजत नव्हते.शेवटी अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आगरकरांनीच १८८४-८६ च्या दरम्यान राजाराम शिरोळे पाटलांशी संपर्क साधुन त्यांना भेटायला गेले.या भेटीत त्यांनी शिरोळे पाटलांकडे शिक्षणसंस्थेसाठी जमीन विकत द्यावी अशी मागणी केली.परंतु शिरोळे पाटील हे मराठा शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी जमीन विकत देण्यास नकार दिला.हवी तर भाड्याने देऊ शकतो अशी सुचना केली.पण टिळकांनी जमीन विकतच हवी असा अट्टाहास धरल्यामुळे शिरोळे पाटलांनी त्यांची मागणी धुडकावून लावली आणि पुढची सर्व बोलणी ठप्प झाली.यानंतर महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती शिरोळेंना या प्रश्नावर विनंती करायला पुढे येत नव्हता.आगरकरांची अडचण अजुनच वाढली.
त्यावेळी कोल्हापुर संस्थानातुन रिजंट म्हणुन शाहु महाराजांचे वडील आबासाहेब घाटगे काम पाहत होते.कागल जहागिरीत त्यांनी जवळजवळ १४ शाळा स्वखर्चाने सुरु केल्या होत्या.शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे आगरकरांचा त्यांच्याशी संपर्क आला.टिळकांनी डाव साधुन आगरकरांना आबासाहेबांकडे जाण्याचा सल्ला दिला व त्यांच्या कानावर हे प्रकरण घातले.आबासाहेब स्वतः शिक्षणप्रेमी होते.दरम्यान १८८३ मधे दिवाण बर्वे विरुध्द चौथे छत्रपती शिवाजी यांच्या प्रकरणात टिळकांनी छत्रपतींची बाजु घेऊन तुरुंगवास भोगल्याची जाण ठेऊन नंतरच्या काळात छत्रपतींचे जवळचे नातेवाईक असणाऱ्या आबासाहेबांनी टिळक-आगरकरांच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीस भरीव अर्थसहाय्य केले आणि तेव्हापासूनच सोसायटीचे सन्माननीय अध्यक्षपद कोल्हापुर छत्रपतींकडे पर्यायाने शाहु महाराजांकडे आजन्म आले.१८८३ मधे चौथे छत्रपती शिवाजी यांचा मृत्यु झाला.त्यानंतर १८८४ मधे शाहु महाराज दत्तक विधानाने कोल्हापुर गादीवर 'राजेसाहेब' म्हणुन विराजमान झाले.आबासाहेबांचा मृत्यु होईपर्यंत शाहु महाराजांच्या वतीने सर्व वाटाघाटींचे काम आबासाहेबच पाहत होते.१८८६ मधे आबासाहेबांचा मृत्यु झाला.त्यानंतर १८८८ पासुनच शाहु महाराजांचा कोल्हापुर-मिरज रेल्वे पायाभरणीच्या निमीत्ताने सार्वजनिक जीवनाशी संबंध आला.१८९२ पर्यंत त्यांनी संपुर्ण भारताचा दोन-तीनदा अभ्यासदौरा केला.दरम्यानच्या काळात आगरकरांच्या विनंतीवरुन शाहु महाराज पुण्यात राजाराम शिरोळे पाटलांकडे आले.एवढा मोठा राजा आपल्या घरी आल्याचे पाहुन शिरोळे पाटलांना गहिवरुन आले.महाराजांनी आज्ञा करावी असा आश्वासक सुर शिरोळे पाटलांच्या बोलण्यातुन व्यक्त झाला.यावर महाराजांनी त्यांना विनंती केली की,आगरकरांना शैक्षणिक कार्यासाठी तुमची काही जमीन भाड्याने द्यावी.शिरोळे पाटील बोलले की,मी इथली जमीन कसतो,अनेक सर्वसामान्य लोक त्यावर उपजिवीका करतात.परंतु तुमचा मान म्हणुन मी या शैक्षणिक कार्यासाठी माझी जमीन भाडेतत्वावर द्यायला तयार आहे.शाहु महाराजांचा आदेश शिरसावंद्य मानुन राजाराम शिरोळे पाटील व त्यांच्या तीन मुलांनी १८९१ साली बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी नाममात्र दराने ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर आपली ३७.५ एकर जमीन 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ला देण्याच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली.आजही भारतात शैक्षणिक कार्यासाठी एवढी जागा देणारे एकही उदाहरण सापडत नाही.
आता जागेचा प्रश्न संपला होता.परंतु काम करण्यासाठी पैशांची चणचण जाणवु लागली.त्यामुळे पुन्हा एकदा आगरकर-टिळक जोडीने छत्रपती शाहु महाराजांना साकडे घातले.त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता शाहु महाराजांनी ५००० रुपयांची मदत देऊन काम सुरु करण्यास सांगितले.एवढेच नाही तर संपुर्ण खर्चाची जबाबदारी उचलण्याची खात्री दिली.एवढे करुन शाहु महाराज थांबले नाहीत,तर तत्कालीन मुंबई चा गव्हर्नर जॉर्ज रॉबर्ट कॅनिंग हॅरिस याच्याशी संपर्क साधुन महाविद्यालय सुरु करण्यासाठी मान्यता द्यावी अशी विनंती लावुन धरली.
शाहु महाराजांच्या चिकाटीमुळे महाविद्यालयासाठी परवानगी मिळाली.त्यानंतर गव्हर्नर जॉर्ज रॉबर्ट कॅनिंग हॅरिस याच्या हस्ते १८९२ मधे इमारतीच्या पायाभरणीचा दगड रचण्यात आला.१८९४ ला शाहु महाराजांचा राज्यारोहण होऊन ते छत्रपती झाले.इमारतीचे काम १८९५ साली पुर्ण झाले.त्याच साली आगरकरांचे निधन झाले.इमारतीच्या पायाभरणीच्या खुणा आजही आपल्याला पहायला मिळतात.पुर्वी या महाविद्यालयाच्या जागी असणाऱ्या शिरोळे पाटलांच्या शेतीतुन वाहणारा पाण्याचा पाट आजही पहायला मिळतो.तसेच ऐतिहासिक एमपी थिएटरजवळ असणाऱ्या विहीरीमुळे भांबुर्ड्यातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटत होता.आजही त्या ऐतिहासिक विहीरीचे दगड पहायला मिळतात.
पुढे राजाराम शिरोळे पाटलांचे वंशज बाबुराव गणपतराव शिरोळे पाटील यांनी या महाविद्यालयात झुलॉजी (प्राणीशास्त्र) विभागामध्ये विभागप्रमुख म्हणुन काम पाहिले.पुढे सेवाज्येष्ठतेनुसार या महाविद्यालयाचे प्राचार्य तेच होणार होते,परंतु जुजबी कारण दाखवुन त्यांची ही संधी हिरावुन घेण्यात आली.
राजाराम शिरोळे पाटलांचे नंतरचे एक वंशज मालोजीराव शिरोळे पाटील यांनी याच महाविद्यालयात शिक्षण घेतले.या महाविद्यालयासाठी छत्रपती शाहु महाराज व आपल्या पुर्वजांनी दिलेल्या योगदानाची त्यांना पुर्ण माहिती होती.त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत १९५८ मध्ये नेमका एक घडलेला किस्सा त्यांनी सांगितला.ज्या छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला,आर्थिक मदत केली त्याच शाहु महाराजांचा महाविद्यालयामध्ये लावलेला फोटो काही नतद्रष्ट लोकांनी काढुन टाकला.ही गोष्ट मालोजीरावांना समजली तेव्हा त्यांनी या कृत्याचा निषेध करुन या कृत्याविरोधात ठाम पावले उचलली. मालोजीराव शिरोळे,माजी मंत्री मधुकरजी पिचड,पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नानासाहेब शितोळे, पालांडे व शिवाजीनगर गावठाणातील तत्कालीन मराठा-बहुजन व मुस्लिम मंडळींच्या साथीने त्यांनी तत्कालीन प्राचार्यांच्या विरोधात आंदोलन केले.दोन वर्षांनंतर १९६० मध्ये प्राचार्यांनी या आंदोलनासमोर शरणागती पत्करली आणि इमारतीच्या रंगरंगोटीसाठी सदर फोटो काढला होता असे जुजबी कारण देऊन तो फोटो परत लावला.या ऐतिहासिक प्रसंगांची आठवण ताजी करताना आजही ७८ वर्ष वय असणाऱ्या मालोजीराव शिरोळेंना गहिवरुन येते.छत्रपती घराण्याशी असणारे भावनिक नाते त्यांनी आपल्या आचरणातुनही जपले आहे.म्हणुन शिवरायांचे आजोबा असणाऱ्या मालोजीराजे भोसले यांच्याप्रमाणेच त्यांनी आपल्या एका मुलाचे नाव शरीफजी असे ठेवले आहे.(शरिफजी शिरोळे - 8605792456)
सदर लेखनप्रपंच करण्यामागचे कारण असे की,आज २०१५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयास वारसा दर्जा मिळाला असताना सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया या महाविद्यालयात कोणकोण शिकले,कुणाचे योगदान मिळाले याचा गौरवपुर्ण उल्लेख करतात,पण खऱ्या अर्थाने ही वास्तु वारसा ठरण्यामागे मोलाचा वाटा असणाऱ्या राजाराम शिरोळे पाटील व छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांचा सर्वांना विसर पडला आहे.त्यांचा कुठेही उल्लेख होत नाही.अगदी फर्ग्युसनच्या वेबसाईटवरही शाहु महाराजांचा उल्लेख नाही.शिरोळेंचाही उल्लेख ओझरता असाच आला आहे.आपल्या संस्थेवर या दोन महान व्यक्तींचे किती उपकार आहेत याची जाण संस्थेला राहिली नाही.म्हणुनच की काय या महाविद्यालयाच्या जागेचे आजही कायदेशीर मालक असणाऱ्या शिरोळे पाटलांच्या घराण्यातील व्यक्तीला मॅनेजमेंट कोट्यातुन प्रवेश घेतानासुध्दा आढेवेढे घेतले जात असल्याचे प्रसंग पहायला मिळत आहेत.
या सर्व पार्श्वभुमीवर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन महाविद्यालय यांना निवेदन देत आहोत की या संस्थेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहु महाराज व राजाराम शिरोळे पाटील यांचा पुतळा व संस्थेसाठी त्यांचे असणारे योगदान याची माहिती संस्थेच्या मुख्य प्रदर्शनीय भागात लावुन त्यांच्याप्रती निदान तरी कृतज्ञता व्यक्त करावी.जेणेकरुन भावी पिढीला ज्यांच्यामुळे या वास्तुला वारसा दर्जा मिळाला व सरकारकडुन अनुदान मिळत आहे त्यांचे ॠण व्यक्त करता येतील.
आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्व शिरोळे कुटुंबातील वंशजांनाही नम्रतापुर्वक विनंती करत आहोत की,ज्या व्यक्ती आपला इतिहास विसरतात त्या व्यक्ती आपला इतिहास घडवु शकत नाहीत.शिरोळे कुटुंबाला इतका गौरवशाली इतिहास असताना त्याबद्दल म्हणावी इतके गांभीर्य पहायला मिळत नाही.म्हणुन तुम्हीही आपल्या पुर्वजांच्या सन्मानासाठी तुमच्या परीने ही मागणी लावुन धरा आणि इतिहासाला खऱ्या अर्थाने पुनर्जीवित करा.या कामात संभाजी ब्रिगेडकडुन तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य राहील याची खात्री बाळगावी.धन्यवाद.
(आवाहन - अभ्यासकांना आवाहन आहे की,या विषयावर तुमच्याकडे अधिक माहिती/पुरावे/कागदपत्रे असतील तर आमच्यापर्यंत पोचवावी,आम्ही ती लोकांपर्यंत पोचवु.)
विनंती - ज्यांना या लेखनाबाबत सत्यता पडताळुन पहायची असेल त्यांनी संपर्क करा.
मालोजीराव शिरोळे पाटील - 9881819205
शरीफजी शिरोळे पाटील - 8605792456
शब्दांकन - अनिल माने.
____________________________________

